Type Here to Get Search Results !

कृषि तंत्र विद्यालय, पुणतांबा येथे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांची भेट कौशल्य आधारीत शिक्षणातून स्वतःचा उद्योग सुरु करणे शक्य - सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके

 

राहुरी विद्यापीठ, दि. 9



जुलै, 2025

कृषि तंत्र शिक्षण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आहे. आपल्या देशात आणि राज्यात शेती हा व्यवसाय बहुसंख्येने केला जातो. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे शिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात केल्यास त्यांना शेती आणि शेती संलग्न व्यवसायातून उत्तम अर्थप्राप्ती होऊ शकेल. शेती व्यवसायात तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास स्वतःचा शेती निगडीत व्यवसाय स्थापन करुन शेती उत्पादनात व उत्पन्नात निश्चितच वाढ होते. या कृषि तंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांना येथील कौशल्य आधारीत शिक्षणातून स्वतःचा उद्योग सुरु करणे शक्य असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांनी केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शासकीय कृषि तंत्र विद्यालयाला महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. प्रशांत बोडके बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खर्डे तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे कर्मचारी श्री सोमनाथ लंघे, श्री. किशोर भाकरे, श्री. दिनेश पंडित, श्री. अंबादास इंगळे व श्री. सचिन राऊत उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पंडित खर्डे यांनी कृषि तंत्र विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी डॉ. प्रशांत बोडके यांनी कृषि तंत्र विद्यालय येथील विद्यार्थी व्याख्यान कक्ष, बीज प्रक्रिया केंद्र तसेच प्रक्षेत्रावरील सोयाबीन बीजोत्पादन प्लॉटला भेट दिली. याप्रसंगी डॉ. बोडके यांच्या शुभहस्ते वनमहोत्सव कार्यक्रम-2025 चे औचित्य साधून विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. बोडके यांनी यावेळी कृषि तंत्र विद्यालयाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments