राहुरी विद्यापीठ, दि. 22
ऑगस्ट, 2025
आयुष्यामध्ये एकातरी खेळात प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे. खेळामध्ये प्राविण्य मिळवायचे असेल तर सराव, सातत्य, जिद्द व चिकाटी असणे गरजेचे आहे. एखाद्या खेळात प्राविण्य मिळविले तर आपला आत्मविश्वास वाढतो. शरीर सुदृढ होते आणि शारिरीक व मानसिक आरोग्य सुधारते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये पदव्युत्तर महाविद्यालयांतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, नियंत्रक सदाशिव पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भणगे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष तथा वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, विद्यार्थी कल्याण अधिकारी (पम) डॉ. विजय पाटील, विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, क्रीडा अधिकारी (पम) डॉ. बाबासाहेब भिंगारदे, सहाय्यक कुलसचिव (पम) गोविंद तागडे व जिल्हा क्रीडा असोसिएशनचे सहसचिव विजय मिस्कीन उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. साताप्पा खरबडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धेत कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राच्या 10 जिल्ह्यातील 40 कृषि महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मुलांचे 35 संघ व मुलींचे 29 संघ असे एकुण 640 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करावे, सांघिक भावना जोपासावी व उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करावे. प्रमुख मार्गदर्शन करतांना ज्ञानेश्वर खुरांगे म्हणाले की शरीर सुदृढ असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतो. सुदृढ शरीरासाठी आयुष्यात कोणत्याही एका खेळामध्ये प्राविण्य मिळवा. क्रीडा क्षेत्र असे आहे की ज्यात तुम्हाला नावलौकिक मिळविता येतो. देशातील सर्वात मोठे सेलेब्रीटी हे खेळाडूच आहेत. यामध्ये दिव्या देशमुख, पंकज शिरसाठ यांचे आयुष्य त्यांच्या क्रीडा प्रकारामुळे स्वर्णमयी झाले. एखाद्या क्रीडा प्रकारात आपण प्राविण्य मिळवून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता येते. यामुळे आपल्याला शासनाकडून भरघोस बक्षीसे मिळतात व सरकारी नोकरी देखील मिळते. खेळामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी अधिक परिश्रम आणि कठोर सरावाशिवाय पर्याय नाही, जीवनातील कोणत्याही यशाला शार्टकट नाही. क्रीडा प्रकारामुळे सांघिक भावना, एकता, परत उभे राहण्याचा हुरुप मिळतो व यातुनच व्यक्तीमत्व विकास घडतो.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शारिरीक शिक्षणाचे प्रात्येक्षिक पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणारे डॉ. सुनील भणगे व डॉ. रविंद्र बनसोड यांचा सत्कार कुलगुरुंच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. विलास यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. बाबासाहेब भिंगारदे यांनी मानले. पदव्युत्तर महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित लांडगे याने विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, पंच, विविध संघाचे संघ व्यवस्थापक, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments