Type Here to Get Search Results !

महात्मा फुले कृषि विद्यापीठात फुले कृषि महोत्सव-2026 थेट पीक प्रात्यक्षिके, शिवारफेरी व कृषि प्रदर्शनाचे आयोजन

 



महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, आत्मा, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने दि. 18 फेब्रुवारी, 2026 रोजी कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि महोत्सव- 2026 थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती मा.ना.श्री. राम शिंदे तसेच जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री तथा अहिल्यानगरचे सन्माननीय पालकमंत्री मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहे. या फुले कृषि महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री मा.ना.अॅड. आशिष जयस्वाल व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. तुषार पवार उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी राज्याचे कृषि आयुक्त मा.श्री. सुरज मांढरे साहेब उपस्थित राहणार आहेत. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनीधी, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या कृषि तंत्रज्ञान घरो घरी, समृध्दी येईल गावो गावी या उपक्रमांतर्गत फुले कृषि महोत्सव-2026 मध्ये विविध पिकांचे 100 एकर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके, कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रात्यक्षिकांमध्ये ज्वारीचे 16 वाण, कडधान्य, तेलबिया व तृणधान्य पिकांचे 27 वाण, भाजीपाला पिकांचे 31 वाण, तसेच भरडधान्य, फळपिके, चारापिके, ड्रोन तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिके विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पहावयास मिळणार आहेत. विविध पिकांचे प्रात्यक्षिके भाजीपाला सुधार प्रकल्प, ज्वारी सुधार प्रकल्प आणि कडधान्य सुधार प्रकल्प या प्रकल्पांच्या प्रक्षेत्रावर बघण्यास मिळणार आहे. विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञान, कृषि निविष्ठा, ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन शेतकर्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. प्रदर्शनस्थळी उमेद अंतर्गत विविध बचट गटांचे खाद्यसंस्कृतीचे स्टॉल असणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन होणार आहे. फुले कृषि महोत्सव-2026 हे सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे असून फुले कृषि महोत्सव-2026 सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी दिली.

Post a Comment

0 Comments