राहुरी- प्रतिनिधी (देवराज मन्तोडे)
बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च कमी करावा लागेल. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे व्यवस्थापन करावे लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले शाश्वत पीक उत्पादनाचे आधुनिक तंत्रज्ञान आरसीएफच्या मदतीने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रभावीपणे पोहोचण्यासाठी संयुक्त संशोधन, शिक्षण व विस्तार कार्यक्रम विषयक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., मुंबई यांच्यामध्ये आरसीएफ, मुंबई येथे द्विपक्षीय सामंजस्य करार संपन्न झाला. याप्रसंगी ऑनलाईन मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सचे मुख्य महाव्यवस्थापक (विपणन) श्री. एन. के. कामत यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या संचालिका (तंत्रज्ञान) सौ. रीतू गोस्वामी, आरसीएफच्या कार्यकारी संचालिका (विपणन) सौ. सुनेत्रा कांबळे, आरसीएफचे महाव्यवस्थापक (कार्पोरेट संप्रेषण व सी.एस.आर.) श्री. मधुकर पाचारणे, मुख्य व्यवस्थापिका (संशोधन व विकास) डॉ. अर्चना काळे व आरसीएफ सल्लागार श्री. दिनेश खामकर उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि नवरत्न सन्मान भूषविणारी भारत सरकारचा उपक्रम असणारी आरसीएफ कंपनी या राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संस्था एकत्र येणे ही काळाची गरज होती. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा सामंजस्य करार साकारणे ही ऐतिहासिक घटना आहे. या सामंजस्य कराराचा विषय शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संतुलित खतांचा वापर, सेंद्रिय पदार्थ आणि जमीन आरोग्य व्यवस्थापन या क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी संयुक्त संशोधन, शिक्षण, विस्तार कार्य व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून वैज्ञानिक कौशल्य व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आदान प्रदान हा आहे. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व आरसीएफ यांच्यातील या सामंजस्य करारामुळे संयुक्तपणे संशोधन व विस्तार कार्यक्रम राबविणे ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने कल्याणकारी ठरेल. सौ. रितू गोस्वामी यावेळी म्हणाल्या की पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनातील विविध समस्यांवर आधारित उपाययोजना करण्यासाठी व खत व्यवस्थापनातील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संयुक्त संशोधन व विस्तार कार्य हाती घेण्यासाठी या सामंजस्य करारामुळे मोठे योगदान मिळेल. हा सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, मृद विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. अविनाश गोसावी व सहयोगी प्राध्यापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments