राहुरी , दि. 1 जुलै, 2025
सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी तसेच कर्मचारी या सर्वांनी आपल्या कार्यालयीन कामात चांगले योगदान दिले. त्यांच्या कामातून त्यांनी इतरांसाठी प्रेरणा ठरेल असा आदर्श ठेवला आहे. विद्यापीठाने आजपर्यंत केलेल्या यशस्वी वाटचालीमध्ये विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जून महिन्यात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार व सेवानिवृत्त विषयक लाभ देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. खरबडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व उपकुलसचिव श्री. विजय पाटील उपस्थित होते.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले की सेवानिवृत्त होणार्या सर्वांनी आपापल्या परीने विद्यापीठासाठी मोठे योगदान दिले आहे. यावेळी त्यांनी डॉ. अनिल काळे, डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. कचरे व इतर सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांच्या विद्यापीठातील कारकीर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ. विठ्ठल शिर्के आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की कोणतीही संस्था असो किंवा शासनाचा विभाग असो यामध्ये मोबदला घेऊन काम करणारे जेव्हा सेवा करण्याचे व्रत घेतात त्यावेळी ती संस्था मोठी होते. या प्रामाणिकपणे काम करणार्या व्यक्तींमुळेच ती संस्था मोठी होते. याप्रसंगी श्री. विजय पाटील यांनी सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांचा जीवनपरिचय करुन दिला.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या राहुरी, धुळे, कोल्हापूर व पुणे या चार विभागातील 12 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यावेळी डॉ. साताप्पा खरबडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बी. एम. कांबळे, डॉ. भरत पाटील, डॉ. एम. आर. पाटील, डॉ. प्रकाश लोखंडे व डॉ. दत्तात्रय सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ. अनिल काळे, डॉ. अनिल दुरगुडे व डॉ. डी.पी. कचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. संजय रुपनर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपकुलसचिव (प्रशासन) श्री. विजय पाटील, सहाय्यक कुलसचिव (प्रशासन) श्री. सागर पेंडभाजे, श्रीमती प्रमिला मगर, श्रीमती शैला पटेकर व श्री. मयूर भोकरे यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments