Type Here to Get Search Results !

शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत कृषि दिन उत्साहात साजरा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे व कृषि विद्यापीठांचे शिल्पकार - विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे

 

राहुरी, दि. 1 जुलै, 2025




माजी मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक हे राज्याच्या हरितक्रांतीचे जनक असून त्यांच्या कार्यकाळातच राज्यातील चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. त्यांचे कृषि क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिन आपण कृषि दिन म्हणुन साजरा करत आहोत. कै. वसंतराव नाईक हे हरितक्रांतीचे व कृषि विद्यापीठांचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्प व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि दिनाचे औचित्य साधुन भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम गावातील शेतकर्यांबरोबर सुसंवाद व प्रक्षेत्र भेटी कार्यक्रमाचे मौजे तांभेरे  येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय कृषि अनुसंधान परिषद शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सचिन सदाफळ तसेच प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, तांभेरे गावचे सरपंच श्री. सागर मुसमाडे, तांभेरे गावचे कृषि सहायक श्री. प्रतीक ठाकरे, प्रगतशील शेतकरी मेजर ताराचंद गागरे, श्री. सुनील पंजाबी, श्री.  महेश गागरे उपस्थित होते.

यावेळी डॉ. ससाणे मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत विद्यापीठाने विकसीत केलेले एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल या गावांसाठी आदर्शवत ठरत आहे. एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी अवलंब करावा असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन सदाफळ यांनी केले तर आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या श्री. महेश गागरे, श्री. शुभम मुसमाडे व मेजर ताराचंद गागरे यांच्या सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांना मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच कनगर येथील श्री. प्रवीण गाडे यांच्या सोयाबीन पीक प्रात्यक्षिकाला भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. विजय शेडगे व श्री. राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments