Type Here to Get Search Results !

गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य व इतिहास गौरवशाली कुलगुरू डॉ. शरद गडाख


राहुरी




        गणेश खिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य हे गौरवशाली आहे. या केंद्राने 1927 यावर्षी पेरूच्या सरदार या वाणाची निर्मिती केली. हे वाण अजूनही शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या केंद्रामध्ये पपई पिकातील संशोधनाचे काम प्रगतीपथावर असून या संशोधन केंद्राने लिची व परदेशी आंबा या पिकांचे लागवड तंत्रज्ञान तसेच नवीन वाण विकासासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेश खिंड, पुणे येथे भेट देऊन तेथील संशोधन कार्य व विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विभागीय संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. नजीमुद्दीन शेख, डॉ. सतीश जाधव, डॉ. ज्योती यादव, डॉ.सुनील लोहाटे, डॉ. भीमराव गोंधळी व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते. 

            डॉ. विठ्ठल शिर्के यावेळी म्हणाले की या संशोधन केंद्रात सुरू असलेल्या रोपवाटिकेमध्ये फळे व भाजीपाला कलम रोपांबरोबरच शहरवासीयांची निकड लक्षात घेऊन शोभिवंत रोपांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी. तसेच त्याचे विक्रीचे नवीन दालन मुख्य रस्त्यालगत सुरू करावे. यावेळी डॉ. सुभाष भालेकर यांनी केंद्राचे कार्य व सुरू असलेल्या संशोधन कार्याचा गोषवारा सादर केला. या भेटीदरम्यान  कुलगुरू डॉ. गडाख यांनी केंद्रावरील विविध संशोधन प्रकल्पांना भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांकडून सुरू असलेल्या विविध प्रयोगांची पाहणी केली व मार्गदर्शन केले. संशोधन प्रकल्पांबरोबरच येथे कार्यरत असलेल्या रोपवाटिका आणि जैविक विविधता केंद्रासही त्यांनी भेट दिली. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments