राहुरी विद्यापीठ, दि. 10 सप्टेंबर, 2025
दिवसेंदिवस शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासत आहे. शेतीमध्ये काम करतांना महिलांना अधिकचे श्रम करावे लागत आहेत. शेतीमधील अधिक तर कामे महिला करतात. कृषि विद्यापीठांनी व अनेक संस्थांनी महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे विकसित केलेली आहेत. महिलांना कृषि यंत्र व अवजारांचे ज्ञान देऊन प्रशिक्षण दिले तर ग्रामीण भागातील शेती समृद्ध होईल. महिलांचे श्रम कमी करायचे असतील तर शेतीमध्ये यांत्रिकीकरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाद्वारे भारत सरकारच्या शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय कृषि मशनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्था, बुदनी, मध्य प्रदेश यांनी मौजे तांभेरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर (महाराष्ट्र) या गावात महिलांसाठी तीन दिवसीय सुधारित कृषि अवजारे व यंत्रांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुळशीदास बास्टेवाड, बुदनी येथील केंद्रीय कृषि मशनरी प्रशिक्षण आणि परीक्षण संस्थेचे वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक इंजी. खजेंद्र बोरा, वरिष्ठ टेक्निशियन अनिश मालविया, राहुरी येथील सुलभ इरिगेशनचे संचालक दत्तात्रय कवाणे, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ, जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख, ग्रामसेवक राजेंद्र ओहोळ, डॉ. रविकिरण राठोड उपस्थित होते.
यावेळी डॉ. सचिन नलावडे मार्गदर्शन करताना म्हणाले की या प्रशिक्षणातून महिलांनी अवजारे व यंत्रे यांचे तंत्रज्ञान जाणून घ्या, आत्मसात करा. कुटुंबातील एक स्त्री कृषि अवजारे व तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब तंत्रज्ञान साक्षर होईल. शेती करताना स्मार्ट शेती करा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. बास्टेवाड यांनी महिलांचे श्रम कमी करणार्या सुधारीत मनुष्यचलीत कृषि अवजारे यांची माहिती व प्रात्यक्षीक दाखविले. याप्रसंगी दत्तात्रय कवाणे यांनीही विविध कृषि अवजारे व यंत्रांचे प्रात्यक्षीक दाखविले. या प्रशिक्षणामध्ये तीनही दिवस कृषि अवजारांची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रविकिरण राठोड, सलीम शेख, राहुल कोर्हाळे व किरण मगर यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला तांभेरे गावातील शंभरहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.


Post a Comment
0 Comments