राहुरी विद्यापीठ, दि. 20 नोव्हेंबर, 2025
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागांतर्गत आवळा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागातील डॉ. बाबासाहेब भिटे, कृषि सहाय्यक श्री. राहुल घुगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विक्रम कड म्हणाले की या प्रशिक्षणामध्ये आवळ्यापासून विविध पदार्थ निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना भविष्यात आपला उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींना आवळा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती ज्यामध्ये आवळा कॅन्डी, आवळा गर साठवणे, आवळा लोणचे, आवळा सरबत, आवळा सुपारी, आवळा मुरंबा, आवळा सिरप व आणि आवळा पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर अन्न सुरक्षितता व मानके, कायद्याची माहिती प्रक्रिया, उद्योगाची नोंदणी, उद्योगासाठी लागणारी मशिनरी व त्यांची देखभाल, पदार्थांचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग, प्रक्रिया उद्योगासाठी शासनाच्या कर्ज योजना, अनुदान यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब भिटे यांनी तर सूत्रसंचालन श्री. राहुल घुगे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. गोरक्षनाथ चौधरी यांनी केले. यावेळी या प्रशिक्षणासाठी मुंबई, पुणे, सातारा, अहिल्यानगर, जालना व नंदुरबार या जिल्ह्यातून आलेले 16 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागातील श्री. पोपट खर्से, श्रीमती सविता धनवडे आणि श्री. सुभाष माने यांचे योगदान असणार आहे.

Post a Comment
0 Comments