Type Here to Get Search Results !

महात्मा फुले कृषि विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगामासाठीची विभागीय बैठक संपन्न बदलत्या हवामानाला अनुकुल असणार्या वाणांची निर्मिती करण्याची गरज - कुलगुरु डॉ. विलास खर्चे


देवराज मंतोडे (वृत्तसेवा )


हवामान बदलाचा विपरीत परिणाम विविध पिकांवर होत आहे. यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अजूनही काही भागात जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत विविध पिकातील उशीरा तयार होणार्या वाणांची गरज निर्माण झाली आहे. यासाठी बदलत्या हवामानाला अनुकुल असणार्या वाणांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले. 

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक रब्बी व उन्हाळी-2025 चे आयोजन हायब्रीड मोडमध्ये करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर, पुणे विभागीय कृषि सहसंचालक यांचे प्रतिनिधी म्हणुन कृषि अधिकारी राऊत व श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गोसावी उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की पारंपारीक पध्दतीने शेती करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. हवामानाचा विपरीत परिणाम जमिनीवर होत आहे. अशा जमिनीत निविष्ठा वापरण्यासाठीचे पोषक वातावरण नसते. परिणामी पिकांची उत्पादकता कमी होते. यासाठी विद्यापीठातील हवामान अद्ययावत काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्यांना वरदान ठरेल. हे तंत्रज्ञान गाव, तालुका व जिल्हा पातळीवर विस्तार यंत्रणांच्या माध्यमातून पोहोचायला हवे. काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान वापरले तर निविष्ठा कमी लागतील व परिणामी शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. विद्यापीठात होणार्या खरीप दिन, रब्बी दिन अशा कार्यक्रमामध्ये कृषि विभागाने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आणून विद्यापीठाचे संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन या बैठकीतील प्रत्याभरणाच्या प्रश्नांवर विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरता येईल. विद्यापीठात कृषि विभागाच्या मदतीने वर्षभर एकत्र येवून काम करु व शेतकरी बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे प्रास्ताविक करतांना म्हणाले की कृषि विभागाच्या अधिकार्यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जवळच्या कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहुन शेतकर्यांचे प्रश्न सोडवावेत. डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधन अहवालाचे सादरीकरण केले. डॉ. साताप्पा खरबडे यावेळी म्हणाले की पाऊस लांबल्यामुळे पेरण्यासुध्दा लांबल्या असून जमिनीतील ओलाव्यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भात वाढेल. यावेळी शेतकर्यांनी विद्यापीठ प्रसारीत करत असलेल्या सल्ला व मार्गदर्शनाचा लाभ घेवून रोग व किडींचे निर्मुलन करावे. यावेळी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, नाशिक व पुणे या कृषि विभागांचे कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, सुभाष काटकर व व पुणे विभागीय कृषि सहसंचालक यांचे प्रतिनिधी म्हणुन कृषि अधिकारी राऊत यांनी त्यांच्या विभागांचा अहवाल सादर केला. या बैठकीदरम्यान डॉ. उत्तम कदम यांनी कांदा व हरभर्यावरील मर रोग, पेरुवरील फळमाशी तसेच ड्रोनद्वारे फवारणी, डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर यांनी कांदा पिकांवर, डॉ. सुभाष भालेकर यांनी परदेशी भाज्या, डॉ. भिमराव कांबळे यांनी फुले मायक्रोग्रेड-2 व नॅनो युरिया याबद्दल, डॉ. विजू अमोलिक यांनी मका, भूईमुग, डॉ. शैलेंद्र गडगे यांनी क्रॉप कव्हरविषयी, डॉ. नितीन दानवले यांनी बियाणेबाबत, डॉ. सुनील कराड यांनी मका पिकांबाद्दल, डॉ. हेमंत पाटील यांनी हरभरा व पेरणी विषयीच्या प्रश्नांवर तर डॉ. मनोज माळी यांनी हळद व आले पिकाबाबत यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. सुनील अडांगळे यांनी मानले. या बैठकीसाठी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता, कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय कृषि अधिकारी, विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभागाचे अधिकारी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments