देवराज मंतोडे ( वृत्तसेवा)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत तांभेरे, कानडगाव ता. राहुरी येथील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, शेतकरी प्रथम प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख उपस्थित होते. शेतकरी दिनाचे औचित्य साधून तांभेरे (ता. राहुरी) येथील तरुण व प्रयोगशील शेतकरी ऋतिक पंडित गागरे यांच्या नैसर्गिक शेती फार्मिंग प्लॉटला मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ऋतिक गागरे यांनी स्वतः तयार केलेल्या जैविक स्लरी, बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र व अग्निअस्त्र यांचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो याची सविस्तर माहिती दिली. रासायनिक खते व कीटकनाशके टाळून नैसर्गिक घटकांच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे हा त्यांच्या शेतीचा प्रमुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.ऋतिक गागरे यांनी गांडूळ खत निर्मितीचा स्वतंत्र प्रकल्प यशस्वीपणे उभारला असून यासाठी त्यांनी भा.कृ.अ.प., च्या शेतकरी प्रथम प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत गांडूळ कल्चर घेऊन वैज्ञानिक पद्धतीने गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. तसेच जैविक स्लरी तयार करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ‘बायोमिक्स’ (जैविक जिवाणूंचे मिश्रण) वापरले जाते. यासोबतच स्लरीमध्ये ट्रायकोडर्मा सारख्या उपयुक्त जैविक घटकांचा प्रयोग करून उत्कृष्ट परिणाम मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या नैसर्गिक इनपुट्सचा वापर त्यांनी केळी शेती, डाळिंबाची बाग, पेरूची बाग तसेच ऊस शेतीमध्ये प्रत्यक्ष केला असून पिकांची वाढ जोमदार झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
.jpeg)

Post a Comment
0 Comments