Type Here to Get Search Results !

गुणवत्ता आणि मानकीकरण हेच कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत कुलगुरू डॉ. विलास खर्चे

 

देवराज मंतोडे ( वृत्तसेवा )

            विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील मानकांचे शिक्षण मिळावे, औद्योगिक मानके आणि गुणवत्ता नियंत्रणाविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'भारतीय मानक ब्यूरो' (BIS) विद्यार्थी शाखेचे योगदान नक्कीच मोठे आहे. हे पाऊल कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. गुणवत्ता आणि मानकीकरण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या विद्यार्थी शाखेच्या ( स्टुडन्ट चाप्टर) उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते.

         याप्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील भारतीय मानक ब्युरोचे संचालक तथा प्रमुख श्री. एस.डी. राणे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, काष्टी, मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे व अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड उपस्थित होते.

         याप्रसंगी श्री. एस. डी. राणे यांनी BIS च्या कार्याची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, मानके केवळ उत्पादन क्षेत्रासाठीच नव्हे तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक प्रक्रियेत अत्यंत आवश्यक आहेत. त्यांनी या शाखेद्वारे विद्यार्थ्यांना BIS च्या प्रयोगशाळा आणि उत्पादक कंपन्याची गुणवत्ता मुल्यांकन कार्यप्रणाली जवळून अनुभवण्याची संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी डॉ. सचिन नलावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी कृषि विद्यापीठ आणि बि.आय. एस.  यांच्यातील सामंजस्य कराराची  माहिती दिली. यामध्ये संशोधन, मानक आधारित शेती आणि कृषी शिक्षण या क्षेत्रात होणाऱ्या संयुक्त कृती बाबतीत सांगीतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्यार्थी शाखेचे मार्गदर्शक  डॉ. अवधूत वाळुंज व आभार प्रदर्शन डॉ. विक्रम कड यांनी केले. याप्रसंगी कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर  कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments