मानवी आरोग्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औषधी वनस्पतींचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. या औषधी वनस्पतींमध्ये जवळजवळ सर्वच आजार मुळापासून नष्ट करण्याची ताकद आहे. त्याचबरोबर सुगंधी व मसालावर्गीय पिकांचेही महत्त्व मोठे असून यामधील संधी शेतकऱ्यांसाठी खूप आहेत. शेतकरी बंधूंनी बाजारपेठेची मागणी लक्षात घ्यावी व औषधी, सुगंधी व मसालावर्गीय पिकांची फायदेशीर असणारी शेती करावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प आणि कालिकत (केरळ) येथील सुपारी व मसाला विकास निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय चर्चासत्राचे उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरजसिंग ठाकूर तसेच याच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अमित शिनगारे उपस्थित होते. यावेळी कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, कडधान्य प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश दोडके, डॉ. संजय गावडे, डॉ. मुकुंद भिंगारदे, डॉ. विलास आवारी, डॉ. नंदकुमार कुटे व औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विक्रम जांभळे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुरजसिंग ठाकूर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींचे मूल्यवर्धित उपयोग याबद्दल माहिती दिली. डॉ. अमित शिनगारे यांनी आयुर्वेदातील औषधे शेतीसाठी नवी दिशा, डॉ. विजू अमोलिक यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींमध्ये शेतकऱ्यांना संधी, डॉ. विक्रम कड यांनी हळद, आले व मिरची लागवड काढणी पश्चात तंत्रज्ञान, डॉ. संजय गावडे यांनी गवती चहा व जावा सिट्रोनेला सुधारित लागवड तंत्रज्ञान, डॉ. विक्रम जांभळे यांनी औषधी व सुगंधी वनस्पतींचे महत्त्व व उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रामध्ये उपलब्ध तंत्रज्ञान, सुधारित शेती व विपणन तसेच आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी नवीन युवकांना या पिकांमध्ये संधी कशा निर्माण होतील यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन डॉ. विक्रम जांभळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी 150 पेक्षा जास्त संख्येने शेतकरी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments