देवराज मंतोडे (वृत्तसेवा
)
महाराष्ट्रातील आंबा पट्ट्यात गेल्या काही दिवसांत लीफ मायनर या कीडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. काजू पिकाची प्रमुख कीड म्हणून ओळखली जाणारी ही कीड आता आंबा पिकावरही नुकसानकारक ठरत असल्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. बदलत्या हवामानामुळे विविध किडींच्या वर्तनात आणि यजमान पिकांच्या निवडीत होणारे बदल हा या नव्या परिस्थितीचा मुख्य घटक असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळा आणि नंतरच्या दमट हवामानामुळे आंब्याच्या कोवळ्या पानांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाला अहमदनगर, सोलापूर तसेच पुणे व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून या किडीचे नमुने प्राप्त झाले आहेत.
अक्रोसेरकॉप्स सिंग्राम्मा या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही कीड आंबा, काजू आणि जांभूळ या पिकांवर आढळते. या अळीची अंडी अतिशय लहान, पारदर्शक व चिकट असून ती कोवळ्या पानांच्या वरच्या बाजूस घातली जातात. एका मादीकडून 36-38 अंडी दिली जातात. 5-7 दिवसांत त्यातून अळी बाहेर येते. सुरुवातीला पांढर्या रंगाची व डोक्यावर पिवळसर-तपकिरी छटा असलेली अळी वाढताना गुलाबी-तांबूस दिसते. या अळ्या पानांच्या उतींमध्ये सुरुंग तयार करून आतमध्येच भक्षण करतात. अळी अवस्था साधारण 10-15 दिवस टिकते. या अळीची कोषावस्था बहुतेक वेळा जमिनीत पूर्ण होते. काहीवेळा पानांच्या घडीतही कोष तयार होतो. त्याचा कालावधी 7-9 दिवस असतो. चांदीसारख्या करड्या रंगाच्या या प्रौढ किडीच्या पंखांवर रुपेरी पट्टे दिसतात. नर 4.5-6.8 मि.मी. तर मादी 7-8.9 मि.मी. लांबीची असते. संपूर्ण जीवनचक्र 20-25 दिवसांत पूर्ण होते. अंड्यातून बाहेर पडताच अळी पानांच्या वरच्या त्वचेच्या थरात खाण्यास सुरू करते. त्यामुळे पानांच्या पृष्ठभागावर वेड्यावाकड्या, वळणदार खुणा दिसू लागतात. नंतर या भागात ब्लिस्टरसारखी फोडसदृश सूज तयार होते. हे भाग वाळल्यानंतर पानं करडी-तपकिरी पडुन वाकडीतिकडी होतात व छिद्रे दिसू लागतात. लहान रोपांवर प्रादुर्भावाचे प्रमाण तुलनेने जास्त असून एका पानावर 1 ते 5 अळ्या दिसतात. नुकसानीमुळे कोवळी पाने कायमची खराब होऊन अकाली गळून पडतात.
या अळीच्या नियंत्रणासाठी राहुरी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख तथा हॉर्टसॅप योजनेचे प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड तसेच प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे, संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे आणि कीटकशास्त्र विभागातील डॉ. सखाराम आघाव यांनी शेतकर्यांना पुढील उपाय तातडीने राबवण्याचे आवाहन केले आहे. प्रादुर्भावग्रस्त कोवळी पाने व अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. किडीची कोष अवस्था जमिनीत असल्यामुळे खाली पडलेला पालापाचोळा साफ करून जमिनीची मशागत करावी, जेणेकरून कोष बाहेर येऊन उन्हामुळे नष्ट होतील. चिलोनस प्रजाती, सिम्पायसिस प्रजाती, क्रायसोचारिस नेफेरियस, ग्रीन लेसविंग यांसारख्या मित्रकिटकांचे संवर्धन करावे. नियमित निरीक्षण ठेवून प्रादुर्भाव प्रारंभीच ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. लीफ मायनर ही कीड आंबा पिकावर दुय्यम मानली जात असली तरी सध्या हवामानातील बदलामुळे तिचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी वेळेवर निरीक्षण व योग्य व्यवस्थापन उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे असे विद्यापीठातील तज्ज्ञांनी आवाहन केले.

Post a Comment
0 Comments