Type Here to Get Search Results !

देशी गाय नैसर्गिक शेतीचा पाया; देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार - कुलगुरू डॉ. विलास खर्चे

 


   कुलगुरू  डॉ. विलास खर्चे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. यावेळेस त्यांनी संशोधन केंद्राने जोपासलेल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या देशी दुधाळ गोवंशांची व खिलार, लाल कंधारी, देवणी, गवळाऊ, कोकण कपिला, डांगी आणि पुंगनूर या देशी गोवंशांची पाहणी केली. संशोधन केंद्रातील सर्व गोठे, दूध उत्पादन व प्रक्रिया युनिट, बायोगॅस सयंत्र, सौर ऊर्जा युनिट, शेण व गोमूत्र प्रक्रिया युनिट, पशुधनाकरता आवश्यक असणाऱ्या आयुर्वेदिक औषधींची धन्वंतरी बाग, गो परीक्रमा, वातावरण नियंत्रित गोठा तसेच संशोधन केंद्राने विकसित केलेले एकात्मिक गोपालन मॉडेल या सर्व बाबींची त्यांनी पाहणी केली. केंद्राद्वारे राबविल्या जात असलेल्या विविध संशोधन कार्यक्रमांची व प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रमांची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या कामाचे कौतुक केले व नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईंची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता हे उभे केलेले काम अत्यंत समय सूचक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. संशोधन केंद्र कृषिविद्या, कृषी
सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी कीटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, मृदा शास्त्र, कृषि अभियांत्रिकी, कृषि अर्थशास्त्र, कृषि विस्तार, अशा कृषीतील सर्व विद्या शाखांना सोबत घेऊन आंतरविद्याशाखीय सहभागातून संशोधन करीत असल्याने त्यास वेगळेच महत्त्व प्राप्त होते असल्याचे ते म्हणाले. या संशोधन केंद्राने केलेले कामाची दखल केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात घेतली जाणे गरजेचे आहे व हे सर्व काम, त्याचे वैज्ञानिक निष्कर्ष यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीचा पाया देशी गाय आहे, त्यामुळे देशी गाईंचे, त्यांच्या विविध जातींचे संवर्धन व संगोपन होणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी नैसर्गिक शेती आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तात्काळ सुरू करणे बाबत सूचना केल्या.


भेटी दरम्यान कुलगुरू महोदयांनी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या सेंटर ऑफ एक्सलन्स च्या सुरुवात झालेल्या बांधकामाची देखील पाहणी केली व महत्त्वपूर्ण सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने उपस्थित होते. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची संपूर्ण माहिती केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली. भेटीकरिता पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धीरज कंखरे, जैविक किड नियंत्रण योजनेचे प्रमुख डॉ. संतोष मोरे, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ताई देवकाते, विभागीय विस्तार केंद्रातील डॉ. मृणाल अजोतीकर व डॉ. विकास भालेराव, पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र विभागातील डॉ. सुजित भालेराव व सौ. विद्या पिंपरकर तसेच देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments