राहुरी विद्यापीठ, दि. 11 डिसेंबर, 2025
माती पाणी परीक्षण करूनच शेतकर्यांनी डाळिंब लागवड करावी. पिकाचे पोषण जमिनीतूनच होत असल्यामुळे जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. निर्यातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मानकांचा संपूर्ण अभ्यास असला पाहिजे. विद्यापीठाने तयार केलेले डाळिंब लागवड तंत्रज्ञान वापरून व कृषी विभागाच्या योजनांच्या सहकार्याने शेतकर्यांनी डाळिंबाची निर्यातक्षम शेती करावी व परकीय चलन मिळवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या इंडो इस्राईल कृषि प्रकल्प, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे, डाळिंब गुणवत्ता केंद्र व अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत डाळिंब उत्पादक शेतकर्यांसाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. डाळिंब लागवड व प्रक्रिया या विषयावर आयोजित या प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, उद्यानविद्या विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुभाष गायकवाड व तालुका कृषि अधिकारी श्री. बापूसाहेब शिंदे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. गोरक्ष ससाणे पुढे म्हणाले की कृषि विभागाने कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने तयार केलेल्या महाविस्तार अॅपचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी वापर करावा. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी पिकांचे नियोजन करायला हवे. शेतीला मूल्यवर्धनाची जोड दिली तरच शेतकरी सक्षम होईल व पर्यायाने देश सक्षम होईल. विद्यापीठाच्या संपर्कात राहून आपला फायदा करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शेतकर्यांना केले. उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील यांनी डाळिंब लागवड व प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करुन शेतकरीभिमुख उपक्रम सुरु केला आहे. याप्रसंगी डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की कोरडवाहू शेतीमध्ये डाळिंब पीक महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी डाळिंबाची रोपे ही विद्यापीठातूनच खरेदी करावीत त्याचबरोबर वाणांची निवड सुद्धा शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानेच करावी. माती, पाणी तपासणी करणे या मूलभूत गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकर्यांनी शेतकरी गट करून एकमेकांच्या संपर्कात राहायला हवे. आपले अनुभव तसेच अडचणी एकमेकांशी शेअर करा. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात रहा व सर्व गोष्टींची शास्त्रोक्त माहिती घ्या. यावेळी डॉ. रवींद्र गायकवाड यांनी फुले सुपर बायोमिक्स या जैविक बुरशीनाशकाविषयी उपस्थित शेतकर्यांना माहिती दिली. बापुसाहेब शिंदे म्हणाले की विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्यांच्या फायद्याचे असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी त्याचा वापर करावा. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कृषि विभागाकडे विविध योजना आहेत. अनारनेट या संकेतस्थळावर नोंदणी केल्यास निर्यातीसंबंधीची सर्व माहिती तसेच बाजारभावाबद्दलही माहिती मिळेल. महाविस्तार अॅपचा उपयोग जास्तीत जास्त शेतकर्यांनी करावा असे यावेळी ते म्हणाले.
याप्रसंगी श्री. वासुदेव लोंढे, श्री. ज्ञानेश्वर गागरे या प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. अजय हजारे, डॉ. सुवर्णा देवरे व डॉ. प्रकाश मोरे यांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तीन दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणात गुटी कलम, छाटणी प्रात्यक्षिक, सूत्र कृमी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन, डाळिंब लागवड व प्रक्रियेशी संबंधीत विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मोरे यांनी तर आभार डॉ. अजय हजारे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी कानडगाव, निंभेरे व तांभेरे येथील 25 डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्पातील कर्मचारी दत्तात्रय गायकवाड, शंकर गायके व अण्णासाहेब जाधव यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment
0 Comments