Type Here to Get Search Results !

डाळिंब उत्पादनाबरोबर प्रक्रियेकडे लक्ष दिल्यास शेतकरी अधिक सक्षम होईल - संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के


राहुरी विद्यापीठ



डाळिंबाचे फळ हे विविध औषधी गुणधर्म, जीवनसत्वे व खनिजे यांचा मोठा स्रोत असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे फळ झाले आहे. अलीकडे सर्वजण प्रकृतीकडे सजगपणे पाहायला लागले आहेत. वाढत्या मागणीमुळे बाजारात डाळिंबाला सध्या चांगला दर मिळत आहे. प्रक्रियायुक्त पदार्थांना देश विदेशात मोठी मागणी आहे. फळापेक्षा जास्त किंमत प्रक्रियायुक्त पदार्थांना मिळते. डाळिंब  पिकविणार्या शेतकर्यांनी डाळिंबाच्या फळ प्रक्रियेकडे लक्ष दिल्यास शेतकरी अधिक सक्षम होतील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या इंडो इस्राईल कृषि प्रकल्प, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे, डाळिंब गुणवत्ता केंद्र व अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत डाळिंब उत्पादक शेतकर्यांसाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते. डाळिंब लागवड व प्रक्रिया या विषयावर आयोजित या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. यावेळी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस.पी. गायकवाड व कृषि विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी श्री. डी.आर. पाटील उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. बी.टी. पाटील म्हणाले की भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी फळपिक लागवड करतांना योग्य फळ पिकाची निवड, त्यासाठी लागणार्या जमिनीची निवड व योग्य वाणाची निवड महत्वाची असते. गेल्या वर्षापासून डाळिंब पिकाला चांगला भाव मिळत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने उत्पादन व देखभाल गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवस चालणार्या या प्रशिक्षणास डाळिंब लागवड व प्रक्रियेशी संबंधीत विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मोरे यांनी तर आभार डॉ. अजय हजारे यांनी मानले. यावेळी डॉ. सचिन मगर, डॉ. सुवर्णा देवरे व प्रशिक्षणासाठी आलेले कानडगाव, निंभेरे व तांभेरे येथील 25 डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments